जगद्गुरू श्री सद्गुरू हंबीरबाबा
!! जगद्गुरू श्रीहंबीरबाबा !!
भारतात विश्वकल्याणकारी अध्यात्मज्ञानाची, ब्रम्हज्ञानाची, संतसाहित्याची जी जुनी परंपरा आजही चालू आहे तिचेच एक वारसदार म्हणजे श्रीहंबीरबाबा !
पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील पाटेठाण येथे १८७९ साली त्यांचा जन्म झाला. देव भेटावा म्हणून त्यांनी १२ वर्षे भारतभ्रमण केले. गाणगापुरात ते २१ दिवस अन्न पाणी वर्ज्य करून ध्यानस्थ बसले होते. शेवटी सलग तीन दिवस त्यांना ईश्वरी साक्षात्कार झाले. त्यातील संदेशानुसार बाबा घरी परतले. सद्गुरू श्रीधोंडिनाथ बाबांकडून अनुग्रह घेऊन योगाभ्यास केला. परिणामी स्वगृही व स्वदेहीच त्यांना देवदर्शन घडले. त्यानंतरच त्यांनी प्रवचन करण्यास सुरुवात केली.
बाबांच्या मनात सामाजिक बांधीलकीची व राष्ट्राबाबतच्या कर्तव्याची जाणीवज्योतही तेवत होती. १९३० साली ते स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झाले होते. जंगल सत्याग्रहाचे यशस्वी नेतृत्वही त्यांनी केले होते. परिणामी त्यांना ६ महिने तुरुंगवासाची शिक्षाही झाली होती.
जातिभेदभावाचे व अस्पृश्यता- निवारणाचेही कार्य त्यांनी केले होते. त्याबद्दल "राष्ट्रीय कीर्तनकार" म्हणून त्यांची तत्कालीन मुंबई सरकारने नियुक्ती करून ५०० रुपयांचे बक्षीसही दिले होते. हरिजन लोकांना बरोबर घेऊन 'सहभोजनाचा' प्रेरणादायी कार्यक्रम राबविल्याबद्दल त्यांच्या पाटेठाण गावाला महाराष्ट्र सरकारने १००० रुपयांचे पारितोषिकही दिले होते.
सण १९५८ साली त्यांनी "विश्वव्यापी मानवधर्म आश्रमाची" स्थापना केली. त्यानंतर १९५८, १९६५ व १९७० साली ते विश्वधर्म संमेलनात सन्माननीय निमंत्रित म्हणून सहभागी झाले होते.
आपल्यानंतरही आपले कार्य चालू रहावे म्हणून त्यांनी "जीवनकलेची साधना" हा खऱ्या देवाचे व खऱ्या भक्तीचे स्वरूप साध्या सोप्या भाषेत स्पष्ट करणारा छोटासा ग्रंथ लिहून ठेवला आहे. हे 'धर्मकार्य सिद्धीस नेल्या'नंतर १४/१०/१९७० रोजी कोजागिरी पौर्णिमेला ते स्वगृहीं समाधिस्थ झाले.
न गुरोरधिकम् ! न गुरोरधिकम् !! न गुरोरधिकम् !!! न गुररोरधिकम् !!!!