विश्वव्यापी मानवधर्म आश्रम
।। * विश्वव्यापी मानवधर्म आश्रम * ।।
संस्थापक : जगद्गुरू श्रीहंबीरबाबा
स्थापना : १९५८
नोंदणी क्रमांक : ई-२३१२ / पुणे
पुणे-नगर रोडवरून नगरकडे जाताना वाघोली गावानजीक राहू फाटा लागतो. राहू रोडने पंचवीस किलोमीटर उत्तरेकडे आत गेल्यावर पाटेठाण गाव लागते. पाटेठाण गावात भीमानदीकिनारी 'विश्वव्यापी मानवधर्म आश्रमाची' इमारत आहे.
आश्रमामध्ये जगद्गुरू श्रीहंबीरबाबांची समाधि आहे. समाधिस्थली एक ध्यानमंदिर व त्याला लागूनच एक सभागृह आहे.
कोणत्याही प्रकारच्या कर्मकांडाशिवाय विश्वातील कोणत्याही धर्माच्या वा जातीच्या स्त्रीपुरुषाला / मानवाला ध्यानरूपी मौन नामस्मरणाने आपला आत्मोद्धार करून घेता येतो, संत श्रीज्ञानेश्वर व श्रीतुकाराम म्हणतात त्याप्रमाणे 'विश्वव्यापी देवाशी एकरूप होता येते', असे श्रीहंबीरबाबांनी 'जीवनकलेची साधना' या स्वधर्मग्रंथात स्पष्ट करून ठेवले आहे.
त्यानुसार, 'देहरूपी आपण'ने, 'जीवरूपी आपण'ने व 'देवरूपी आपण'ने आचरावयाचा स्वधर्म शिकवणे, त्याद्वारे मानवी एकात्मता व विश्वबंधुत्वाचा भाव लोकमानसात वृद्धिंगत करणे, हे पारमार्थिक कार्य आश्रमाच्या माध्यमातून आयोजित केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांद्वारे १९५८ सालापासून केले जात आहे.
आपण सर्व मानव-जीव हे एकाच परमेश्वराचे अंश आहोत. म्हणून जीवरूपी 'स्व'ने देवरूपी 'स्व'चे 'सो s हं-भावयुक्त ध्यान करणे' ही देवाला आवडणारी थोर म्हणजे खरी भक्ती होय. आपल्याप्रमाणे सर्वजण व सर्वकाही मूलतः आत्मरूप (देवरूप) आहे, या सद्भावाने, समत्वबुद्धीने विनम्रपणे दैनंदिन कर्तव्याचरण करणे हा 'खरा आश्रमधर्म' होय.
थोडक्यात, श्रीहंबीरबाबांची जन्मभूमी, तपोभूमी व आता साधकांना स्वधर्माची म्हणजे विश्वव्यापी मानवधर्माची शिकवण देणारे एक क्षेत्र म्हणजे पाटेठाण येथील विश्वव्यापी मानवधर्म आश्रम होय.