प.पु.श्री.सद्गुरु सुमंतबापू हंबीर
।। * * सद्गुरू समर्थ श्री. सुमंतबापुजी हंबीर * * ।।
ज्या मार्गावरून गेल्यामुळे श्रीज्ञानेश्वरतुकारामादी संतांना ज्ञानदृष्टी लाभली, आत्मदेवदर्शन घडून ते सर्वसुखी झाले, त्या थोर भक्तीमार्गाची, तसेच समर्थ श्रीरामदासस्वामींनी उपदेशिल्याप्रमाणे 'प्रपंच करून परमार्थाचा लाभ करून घेणारा भला माणूस' व्हावयाचे असते त्या प्रपंच-परमार्थ-विवेकाची, शिकवण देण्याचे श्रीहंबीरबाबा यांनी आरंभिलेले पारमार्थिक कार्य त्यांच्यानंतर आता त्यांचे सुपुत्र व सत्शिष्य या नात्याने गुरुपुत्र असलेले परमपूज्य सदगुरू समर्थ श्री. सुमंतबापूजी हंबीरदेखील करीत आहेत. विश्वव्यापी मानवधर्म आश्रमाचे ते अध्यक्षही आहेत.
श्रीज्ञानेश्वरादी संतांनी केलेल्या 'ध्यानरूपी मौन नामस्मरणाची रीत' समजावून सांगणारा अनुग्रह ते देतात. नामस्मरणरूपी योगसाधना करताना ज्या अडीअडचणी येतात त्यांचे साधकांना 'अधिकार तैसा उपदेश' करून ते निवारण करतात.
वैयक्तिक मार्गदर्शन व जाहीर प्रवचनांमधूनही भक्तियोगमार्गावरील गुह्य व गूढगम्य बाबींबाबत नेमकेपणे मार्गदर्शन करीत संत श्रीतुकाराम म्हणतात त्याप्रमाणे 'आपणासारिखे' करण्याचे धर्मकार्य ते अथकपणे करीत आहेत.
प्रापंचिक जीवनातील व आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण होण्यासाठी संतांनी सांगितल्याप्रमाणे 'नामस्मरणपूर्वक कर्तव्याचरण' करण्याबाबत व 'नामरसायन' घेण्याबाबत ते उपदेश करीत असतात. परिणामी, आपण संकटमुक्त झाल्याचे व आपली आध्यात्मिक प्रगती होत असल्याचे हजारो शिष्य व भाविक लोक त्यांना कृतज्ञपणे कळवीत वा सांगत असतात :
श्री. हंबीरबापुजी सांगतात त्याप्रमाणे 'एकले अवधान देत' आत्मारामाची मोठ्या आवडीने, प्रेमाने, निष्ठेने सो s हं-भावयुक्त उपासना करतात त्या सर्व साधकांना शरीर, मन, बुद्धी व प्राण यांचे आरोग्य प्राप्त झाले आहे; व्यसनाधीन झालेले व कुमार्गाला लागलेले अनेक तरुण व्यसनमुक्त होऊन सन्मार्गाला लागले आहेत; अनेकांचे उद्ध्वस्त व्हावयास आलेले संसार मार्गी लागले आहेत; जिथे डॉक्टरांचे इलाज यशस्वी होऊ शकले नाहीत अशा अनेक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या-मोठ्या आजारातून, दुखण्यातून बऱ्या झाल्या आहेत.
थोडक्यात, आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी व ज्ञानी या चारही प्रकारच्या भक्तांना सन्मार्गदर्शन करण्याचे ईश्वरदत्त कार्य श्रीहंबीरबाबांप्रमाणे श्रीहंबीर बापुजीही अविरतपणे करीत आहेत.